फलटणचा सुर हरपला; संगीत शिक्षिका मिनाताई बर्वे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. २ : सलग चौथी पिढी वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या बर्वे कुटुंबाने लोकप्रेम, आपुलकी, सेवाभाव अखंड जपला असून याच बर्वे कुटुंबातील प्रख्यात संगीत शिक्षिका, संगीताच्या गाढया अभ्यासक मीनाताई पंडीतराव बर्वे यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवार, दि.31 मे रोजी निधन झाले.

भारतात संगीतामध्ये दोन स्वरलिपी प्रचलित आहेत, पहिली उत्तर भारतात वापरली जाणारी पंडित विष्णू दिगंबर भातखंडे यांची, आणि दुसरी ग्वाल्हेर घराण्यातील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची स्वरलिपी दक्षिण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात जास्त वापरली जात होती. याच पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे भाचे गणेश उर्फ बाबुराव गोखले, मुंबई यांच्या सुकन्या मीनाताई बर्वे. मीनाताईंचे शिक्षण मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालय (एसएनडीटी) येथे पूर्ण झाले. मीनाताई यांनी संगीत क्षेत्रातील एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

1950 मध्ये फलटणच्या मधुसूदन उर्फ पंडितराव बर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. एकोणिसाव्या शतकातील सत्तरच्या दशकात म्हणजे 1970 च्या पूर्वी त्या मुधोजी हायस्कुलमध्ये संगीत अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. संगीत अध्यापिका असताना त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबविले. म्युझिक सर्कल हा मुधोजी हायस्कुलमधील त्यांचा उपक्रम खूप गाजला. म्युझिक सर्कल या उपक्रमाद्वारे त्याकाळातील भारतातील अनेक दिग्गज संगीतकार आणि गायकांच्या मैफलीचा अनुभव फलटणकरांना लाभला. मिनाताईंमुळेच पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित सुरेश तळवलकर, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या गायक वादकांची फलटणकरांना ओळख झाली.

मीनाताईंनी मुधोजी हायस्कुलमध्ये केवळ अध्यापिका म्हणून काम केले नाही तर गंधर्व महाविद्यालय, पुणेच्या अखत्यारीत फलटण येथे महाराष्ट्र संगीत विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयाच्या माध्यमातून अगदी विषारद पूर्ण केलेले संगीतातील विद्यार्थी त्यांनी तयार केले.

संगीताची उत्तम जाण असणार्‍या एकमेव मीनाताई बर्वे या फलटणचे वैभव होत्या. तबला, सतार, व्हायोलीन यासारख्या वाद्यांसहित जलतरंगसारखी कठीण वाद्य हाताळण्यात मीनाताईंचा हातखंडा होता. मनमिळाऊ, शांत स्वभाव व समजून सांगण्याची हातोटी त्यांना अवगत होती. शास्त्रीय संगीतातील रागांची आणि तालांची त्यांना जाण होती.

मीनाताई यांच्या निधनाने फलटणच्या संगीत क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!