
दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । फलटण । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) कामगार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी कुचंबना होत असताना कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनाने बंद केलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरु होत असताना फलटण – लोणंद आणि फलटण – पुणे मार्गावर आजपासून रेल्वे सेवा सुरु झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे, तथापी फलटण – पुणे मार्गावरील रेल्वेच्या वेळा प्रवाशांच्या सोईच्या असल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने पुणे – फलटण व लोणंद – फलटण दरम्यान डेमू रेल्वे सेवा गुरुवार दि. १० फेब्रुवारी पासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार फलटण – पुणे व फलटण – लोणंद मार्गावर रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यापैकी फलटण – लोणंद मार्गावरील सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती, ती पूर्ववत सुरु करण्यात आली आहे तर फलटण – पुणे मार्गावर प्रथमच रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे, लवकरच फलटण – मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
फलटण – पुणे मार्गावर गाडी क्रमांक 01535 पुणे येथून पहाटे ०५.५० वाजता पुणे येथून सुटेल व सकाळी ०९.३५ वाजता फलटणला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01536 फलटण येथून सायंकाळी ६.०० वाजता सुटेल व पुणे येथे रात्री ०९.३५ वाजता पोहोचेल. सदर गाडी सासवड रोड, जेजुरी, नीरा, लोणंद व सुरवडी स्टेशनवर थांबेल.
गाडी क्रमांक 01538 फलटण येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल व १२.२० वाजता लोणंदला पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01537 लोणंद येथून दुपारी ३.०० वाजता सुटेल व फलटण येथे ०४.२० वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल.
दहा कोच असलेल्या या दोन्ही डेमू गाड्या रविवार व्यतिरिक्त प्रतिदिन सेवेत असतील.
प्रवाशांनी कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रवासाकरीता जारी मार्गदर्शक सूचना, जसे प्रवासा दरम्यान मास्क वापरणे, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायझर उपयोग आदींचे पालन करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे. दरम्यान फलटण – लोणंद रेल्वे प्रवासासाठी प्रति व्यक्ती ३० रुपये आणि फलटण – पुणे प्रवासासाठी प्रति व्यक्ती ६० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.