फलटणच्या ‘मनोमिलना’वर नेत्यांची ‘चुपी’; तर अजित पवारांची धीरेंद्रराजेंशी तासभर खलबते

"फलटणमध्ये नक्की काय चाललंय?" उपमुख्यमंत्र्यांचा सवाल; 'जनसंवाद यात्रे'च्या नियोजनाला लागण्याचे धीरेंद्रराजेंना आदेश


स्थैर्य, फलटण, दि. 30 सप्टेंबर : फलटण तालुक्यात दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये ‘मनोमिलन’ होणार असल्याची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून जोरात सुरू आहे. यासाठी विविध ठिकाणी बैठका झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या चर्चेला अद्याप दोन्ही प्रमुख राजकीय गटांच्या नेत्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जर हे मनोमिलन होणार नसेल, तर मग नेत्यांनी १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चांवर ‘चुपी’ (मौन) का बाळगली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांचे सुपुत्र, युवा नेते श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर-निंबाळकर यांनी आज सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “धीरेंद्र, नक्की फलटणमध्ये काय चाललं आहे?” असा थेट प्रश्न विचारल्याचे समजते. या प्रश्नामुळे, तालुक्यातील स्थानिक आघाड्यांच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात ‘मनोमिलना’साठी इच्छुक असलेल्या फलटणमधील काही नेत्यांना उपमुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नव्हती, अशी चर्चा होती. त्याउलट, आज धीरेंद्रराजे यांना उपमुख्यमंत्र्यांनी तब्बल एक तास वेळ दिल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ‘मनोमिलना’बाबत वेगळी भूमिका घेणार का, यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

“विधानसभा निवडणुकीत फलटणच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. आपण त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते,” असे सांगत, “येणाऱ्या काही महिन्यांत फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ‘जनसंवाद यात्रा’ येणार आहे, तुम्ही नियोजनाला लागा,” अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धीरेंद्रराजे यांना दिल्याची माहिती आहे.


Back to top button
Don`t copy text!