फलटणच्या राजकारणात मोठी घडामोड! रणजितदादा, आ. सचिन पाटील अन् शिवरूपराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भटीला मुंबईत


सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांनी सत्तास्थापनेच्या रणनितीसाठी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १७ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय न बसतोय, तोच सत्तेची समीकरणे आणि गणिते जुळवण्यासाठी फलटणच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली रस्सीखेच आणि पंचायत समितीत झालेला ‘टाय’ या पार्श्वभूमीवर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत. या अचानक झालेल्या ‘मुंबईवारी’मुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालांमध्ये सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. दुसरीकडे, फलटण पंचायत समितीतही ८-८ अशी समसमान (टाय) परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेच्या या अत्यंत अटीतटीच्या लढाईत आपल्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि विरोधकांना सत्तेबाहेर रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांकडून आता ‘मास्टरप्लॅन’ आखला जात असल्याची दाट शक्यता आहे. याच अत्यंत महत्त्वाच्या ‘पॉवर गेम’चा भाग म्हणून फलटणच्या या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची तातडीची भेट घेत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचीही घेतली भेट!

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षांशीही समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. कालच (दि. १६) आमदार सचिन पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचीही सदिच्छा भेट घेतली होती. एका बाजूला मुख्यमंत्र्यांची आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने, आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ‘महायुती’चाच झेंडा फडकवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठी राजकीय ताकद वापरली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या उच्चस्तरीय भेटींमध्ये नेमकी कोणती खलबते झाली?

फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी कोणती खेळी खेळली जाणार? आणि सातारा झेडपीत सत्तेचा ‘जादुई आकडा’ गाठण्यासाठी वरिष्ठ नेते कोणती राजकीय खेळी करणार? याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मुंबई दौऱ्यानंतर फलटणच्या स्थानिक राजकारणात मोठे ‘धक्के’ पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Back to top button
Don`t copy text!