दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । फलटण । फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाची जागा आरपीआयच्या कोट्यातील असून आगामी विधानसभा निवडणूकीत या जागेची आम्ही मागणी करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
पँथरच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले जुन्या पिढीतील कार्यकर्ते चंद्रकांत अहिवळे यांच्या आकस्मित निधनानंतर येथे आयोजित शोकसभेसाठी येथे आलेले मंत्री आठवले त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी आरपीआय राज्य, जिल्हा व स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. खरी ‘शिवसेना’ कोणती व ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार असा यक्ष प्रश्न महाराष्ट्राला भेडसावतो आहे, परंतू दोन तृतीयांश बहुमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुने असल्याने धनुष्यबाण चिन्ह त्यांनाच मिळेल अशी आम्हाला अपेक्षा असून निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असे मत यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे खरी’ आणि ‘उध्दव ठाकरेंची शिवसेना आहे बरी’ असे सांगत मंत्री आठवले म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आपण भाजपसोबत येणे आवश्यक आहे असे उध्दव ठाकरे यांना मी नेहमी सांगत होतो, परंतू निर्णय घेण्यास त्यांनी फार वेळ लावल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत महाबंड झाले. जर उद्धव ठाकरे यांनी आपले ऐकले असते तर शिवसेनेत फुट पडली नस्ती असे सांगत एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक व खंबीर नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे ते वारसदार आहेत, त्यामुळे त्यांनाच शिवसेना चालविण्याचा अधिकार आहे.
द्रौपदी मूर्मु यांच्या रुपाने एक तारा चमकला आहे, आता तो राष्ट्रपती पदावर आरुढ होणार आहे. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करुन भाजपने दलित समाजाला न्याय दिला, आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात द्रौपदी मूर्मु या राष्ट्रपती झाल्याने आदिवासी समाजास न्याय मिळाला असल्याचे मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.
आपल्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे या वर्षीचे बजेट एक लाख ४२ हजार २३९ कोटी एवढे आहे. दलित समाजाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करतानाच ‘सबका साथ, सबका विकास’ या भुमिकेतुन देशाला विकासाच्या व प्रगतीच्या वाटेवर नेणारे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने लाभल्याचे यावेळी रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले.