दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या प्रलंबीत शासकीय व वैयक्तिक कामांच्या निवाड्यासाठी एक अनोखा प्रसंग मिळणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १० जानेवारी २०२५ रोजी फलटण तालुक्यात जनता दरबार भरवण्यात येणार आहे. या जनता दरबारात फलटण तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल, ज्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण होण्यास मदत होईल.
फलटण तालुक्यातील सर्व नागरिक बंधू-भगिनी, कार्यकर्ते यांनी या जनता दरबाराची नोंद घेऊन, त्यांच्या प्रलंबीत सार्वजनिक व वैयक्तिक कामांचे लेखी अर्ज (तपशीलासह) २ प्रती मध्ये आमदार सचिन पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, महाराजा मंगल कार्यालया शेजारी, लक्ष्मीनगर, फलटण या ठिकाणी दि. ६ जानेवारी २०२५ अखेर पर्यंत जमा करावेत. या अर्जांवरच फक्त १० जानेवारीच्या जनता दरबारात सुनावणी तथा निवाडा होईल. ऐन वेळी आलेले अर्ज तथा प्रश्न स्विकारले जाणार नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
या जनता दरबारात प्रत्येक विभागाच्या निवाड्यासाठी विभागवार स्वतंत्र वेळ दिला जाईल, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यात सुलभता होईल. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा आहे व त्यांना शासकीय यंत्रणेशी सीधा संवाद साधण्याची संधी देणार आहे.