लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी फलटण सज्ज; पालिकेच्या स्टॉल योजनेचे नागरिकांकडून स्वागत

गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत उत्साह; एकाच ठिकाणी मूर्ती उपलब्ध झाल्याने भाविकांची सोय


स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होत असून, फलटण शहरात सर्वत्र उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू झाली असून, बाजारपेठ चैतन्याने फुलून गेली आहे.

यंदा प्रथमच फलटण नगरपरिषदेने गणेशमूर्ती विक्रीसाठी एक अभिनव आणि अत्यंत सोयीस्कर उपक्रम राबवला आहे. शहरातील महात्मा फुले चौक ते माळजाई या परिसरात मूर्तिकारांसाठी आकर्षक आणि सुसज्ज स्टॉल्सची एकाच रांगेत उभारणी केली आहे. यामुळे शहरातील सर्व गणेशमूर्ती एकाच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारची शिस्त आली आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. दरवर्षी भाविकांना मूर्ती खरेदीसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत होते. मात्र, या ‘एक खिडकी’ योजनेमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचले असून, त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या सुंदर मूर्तींमधून आपल्या आवडीची मूर्ती निवडण्याची सोय झाली आहे.

नगरपरिषदेच्या या उत्तम नियोजनामुळे वाहतुकीला अडथळा न होता मूर्ती विक्री सुरळीतपणे सुरू आहे. या सोयीस्कर आणि शिस्तबद्ध व्यवस्थेचे फलटणमधील नागरिक आणि भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक आणि स्वागत केले जात आहे. या उपक्रमाने शहरातील उत्सवी वातावरणात आणखी भर घातली आहे.


Back to top button
Don`t copy text!