
भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांच्या आजी इंदुमती नरसिंगराव रणवरे यांचे ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. कुटुंब व परिसरातून हळहळ व्यक्त.
स्थैर्य, फलटण, दि. 19 जानेवारी : भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांच्या आजी श्रीमती इंदुमती नरसिंगराव रणवरे यांचे ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रणवरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ज्येष्ठ मातृशक्ती म्हणून ओळख असलेल्या श्रीमती इंदुमती रणवरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी संघर्षाच्या काळात कुटुंब एकत्र ठेवत पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण केल्याची भावना कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
श्रीमती इंदुमती नरसिंगराव रणवरे यांचा जन्म सगोबाचीवाडी (पणदरे) येथील भोईटे–देशमुख घराण्यात झाला. विवाहानंतर त्या निंभोरे, ता. फलटण येथील रणवरे कुटुंबात आल्या. सासरकडील परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी मोठ्या धैर्याने संसाराचा गाडा हाकला आणि कुटुंबातील प्रत्येक घटकाला आधार दिला.
“संघर्षाच्या काळात घराचे घरपण कसे जपायचे, हे आमच्या आजीने दाखवून दिले. त्या आमच्यासाठी आदर्श माय माऊली होत्या,” अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहील, असेही कुटुंबीयांनी नमूद केले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी रणवरे कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.
