
स्थैर्य, फलटण, दि. 9 ऑक्टोबर : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आज, गुरुवारी, ‘इनोव्हेशन २K२५’ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या एकसष्टीपूर्तीनिमित्त आयोजित या स्पर्धेत ८ राज्यांतील ७०४ संघांमधून २,६३२ हून अधिक विद्यार्थी आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करत आहेत.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि फलटणचे नाव राष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर ठळकपणे पोहोचवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. प्रथमच फलटणमध्ये अशा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन होत असून, यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या शाखांमधील प्रकल्प सादर होत आहेत. कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि स्मार्ट शहरे यांसारख्या सामाजिक आव्हानांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर केल्या आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रासाठी आयआयएबीएम इन्स्टिट्यूट, पुणेचे संस्थापक कर्नल विनोद मारवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी हे सन्माननीय अतिथी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व आमदार रामराजे नाईक निंबाळकर होते. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभासाठी एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पुणेच्या कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी कमिन्स इंडिया, गोविंद मिल्क, ॲसेंट सॉफ्टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य केले आहे. या स्पर्धेमुळे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्पर्धेचे कन्वेनर डॉ. मनोजकुमार दळवी यांनी व्यक्त केले. प्रा. अमरसिंह रणवरे व प्रा. धनश्री भोईटे यांनी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून काम पाहिले.