श्रीमंत रामराजेंनी दिली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमदारकीची शपथ : फलटणकरांनी व्यक्त केला अभिमानाने आनंद
स्थैर्य, सातारा दि.18 : राजकारणात कोण कोणत्या पक्षाचा का असेना मात्र राजकारणासह विविध क्षेत्रात सातारा जिल्ह्यातील वीरांनी मैदान गाजवले आहे. याचा सातारा जिल्हावासीय म्हणून नक्कीच सर्वांना अभिमान वाटतो. सातारा जिल्ह्याला राज्याचे मुख्यंत्रीपदी यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने संधी मिळाली होती. पण आज मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच शपथ देण्याची संधी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद सदस्याची म्हणजेच आमदारकीची शपथ श्रीमंत रामराजे देत आहेत. राज्याचे सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. याच अभिमानाने आज जिल्ह्यातील श्रीमंत रामराजे यांच्या कार्यकर्त्यांची छाती अभिमानाने व गर्वाने फुलली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. जयंत पाटील, ना. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ना. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये 13 पैकी 4 उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली होती.
शपथ घेतलेले सदस्य
शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोर्हे
भाजप – गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड
राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी
काँग्रेस – राजेश राठोड