स्थैर्य, फलटण, दि. ५ : मार्च महिन्याचे सुरवातीचे दिवस फलटणकरांसाठी अंग भाजून काढणारे आणि आगामी उन्हाळ्याची दाहकता दाखविणारा ठरले. आतापर्यंत २७ ते ३० अंशांवर असणारा तापमानाचा पारा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक ३६ अंशांवर गेल्याने फलटणकरांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागला. गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल जाणवत असून, थंडीपासून उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. रात्रीचे तापमान कमी जास्त होत आहे. सकाळी मात्र आल्हाददायक गारवा असतो. मधी आधी कधीतरी ढगाळ वातावरणही होत होते. दिवसभर आभाळ पूर्ण निरभ्र झाले. फलटण मध्ये रात्रीचे तापमान कमाल २२ अंशांवर गेले आहे. दिवसाचे तापमानही २७ वरून वाढत जाऊन ते दुपारी १२ वाजता ३५ अंशांपर्यंत गेले. दुपारी एक ते तीन या दरम्यान, तर पारा ३६ अंशांवर पोहोचल्याने कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत होती. थंडाव्यासाठी प्रत्येकजण सावलीचा आडोसा शोधताना दिसत होता. डोके तापत असल्याने डोक्यावर कापड गुंडाळून घेतले जात होते. तहान शमविण्यासाठी सरबत, कलिंगड, आइस्क्रीम विक्रीच्या दुकानांकडे पावले वळत होती.