दैनिक स्थैर्य | दि. 05 जुलै 2024 | फलटण | सध्या फलटण तालुक्यात पोलीस प्रशासनाचे किंचितही लक्ष नाही. जो मुलगा फिर्याद द्यायला येत आहे; त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे काम फलटणचे DYSP करीत आहेत. DYSP यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ह्या DYSP यांच्या काळामध्ये फलटण तालुक्याचा बिहार झाला आहे; असे मत बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण शहर पोलिस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलनासाठी श्रीमंत रघुनाथराजे बसले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मनीवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना रघुनाथराजे म्हणाले की; फलटणमध्ये डॉ. जे. टी. पोळ नामक एक डॉक्टर आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दाखले देण्यात येत असतात. त्या दाखल्यांच्या आधारांवर पोलीस प्रशासन हे निष्पाप मुलांना अडकवत आहे. पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांचा दोष नाही तर DYSP यांची भूमिका ही योग्य नाही. DYSP यांच्या दालनामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सचिन अहीवळे यांनी बसून काल गुन्हा दाखल करून घेतला आहे.
दोन मुलांमध्ये काही वाद झाले त्यामध्ये एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अद्यापही तो गंभीरच आहे. ज्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे; त्याच्यावर सुद्धा 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; ही बाब विशेष आहे. याचा अर्थ मयातावर सुद्धा 302 दाखल करायला मागे पुढे हे बघणार नाहीत; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोट्या केसेस दाखल होवू नयेत; यासाठी हे ठिय्या आंदोलन होते. जे काही सत्य असेल तेवढेच पोलिसांनी दाखल करून घेतले पाहिजे व सत्यासोबतच पोलिसांनी राहणे गरजेचे आहे; असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.