फलटणमध्ये १०० ग्रामपंचायतींसाठी ‘महासंग्राम’; प्रभाग रचनेचे आदेश धडकले, ‘खासदार विरुद्ध राजे’ गटात रंगणार ‘काँटे की टक्कर’


महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, फलटण तालुक्यातील १३१ पैकी तब्बल १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. गावात ‘थेट सरपंच’ निवडीसाठी आता ‘खासदार गट विरुद्ध राजे गट’ असाच थेट व अटीतटीचा सामना रंगणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १७ फेब्रुवारी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता फलटण तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात एका नव्या ‘महासंग्रामाची’ ठिणगी पडली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या अधिकृत आदेशामुळे फलटण तालुक्यातील एकूण १३१ पैकी तब्बल १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या गावगाड्याच्या सत्तेसाठी तालुक्यात पुन्हा एकदा ‘खासदार गट विरुद्ध राजे गट’ असा अत्यंत अटीतटीचा आणि प्रतिष्ठेचा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.

जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींसाठी हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागू राहील. शासनाच्या या आदेशामुळे निवडणुका रखडल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, प्रशासकीय यंत्रणांसह राजकीय पुढाऱ्यांचीही मोठी धावपळ उडाली आहे.

‘खासदार विरुद्ध राजे’ गटात थेट भिडत!

फलटण तालुक्याचे राजकारण सध्या अत्यंत तापलेले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीत दोन्ही गटांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. आता थेट गावातील सत्ता आणि कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत ठेवण्यासाठी या १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन्ही गटांसाठी ‘अस्मितेचा प्रश्न’ बनणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ‘खासदार गट’ आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा ‘राजे गट’ या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली छुप्या बैठका आणि मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

‘थेट सरपंच’ पदामुळे वाढली ईर्ष्या

या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘थेट सरपंच’ (जनतेतून थेट निवड) पदाची निवडणूक. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने या निवडणुकांना ‘मिनी आमदारकीचे’ महत्त्व प्राप्त झाले असून, गावागावांत इच्छुकांची मोठी झुंबड उडाली आहे. स्थानिक समीकरणे, गटबाजी आणि प्रस्थापित घराण्यांना या ‘थेट सरपंच’ निवडीमुळे मोठा राजकीय संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम:

शासनाने दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रभाग रचनेचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • ५ मार्च २०२६: तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे.

  • ७ एप्रिल २०२६: प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक.

  • ४ मे २०२६: सर्व सुनावणी व प्रक्रियेअंती राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देणे.

या कार्यक्रमानुसार मे महिन्याच्या सुरुवातीलाच प्रभाग रचना अंतिम होणार असल्याने, पावसाळ्यापूर्वी निवडणुकांचा बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात आता उन्हाळ्याच्या कडाक्यासोबतच राजकीय उष्णताही शिगेला पोहोचणार आहे.


Back to top button
Don`t copy text!