
फलटण येथील प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेत १७ ते २० जानेवारीरम्यान १३८ वा जन्मोत्सव साजरा होणार असून हरिपाठ, कीर्तन, प्रवचन व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १७ जानेवारी : फलटण येथील प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या वतीने प.पू. गोविंद महाराज उपळेकर यांचा १३८ वा जन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. मिती माघ शुद्ध २ ते माघ शुद्ध ५ या कालावधीत, दि. 17 जानेवारी ते दि. 20 जानेवारीदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प.पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त फलटण शहरात तीन दिवस हरिपाठ, नारदीय कीर्तन, प्रवचन सेवा, भजन व आरती असे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात फलटण शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी हरिपाठ व अभिषेक, दुपारी भजन, तर सायंकाळी प्रवचन सेवा होणार आहे. दुसऱ्या दिवशी नारदीय कीर्तन व विविध भजन मंडळांचे कार्यक्रम, तर तिसऱ्या दिवशी सकाळी प्रवचन आणि सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व महाआरतीने उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
या जन्मोत्सव सोहळ्यात संत नामदेव महाराज परंपरेतील कीर्तनकार, प्रवचनकार आणि विविध भजन मंडळे सहभागी होणार असून, संत परंपरेतील विचारांचे प्रबोधन भाविकांना मिळणार आहे.
फलटण शहर व परिसरातील भाविकांनी या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
