फलटणकरांसाठी ‘गुड न्यूज’; अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा! रणजितसिंह व सचिन पाटलांच्या प्रयत्नांना मोठं यश; साखरवाडीतही होणार अप्पर तहसील कार्यालय


फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी तर साखरवाडीत अप्पर तहसील कार्यालय होण्यासाठी हालचाली वेगवान. पुणे विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. 10 जानेवारी : फलटण तालुक्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालणारी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फलटणकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेले ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय’ (Additional Collector Office) आणि साखरवाडीसाठी ‘अप्पर तहसीलदार कार्यालय’ (Additional Tehsildar Office) सुरू होण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने या संदर्भात तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानले जात आहे.

शासकीय हालचालींना वेग, पुण्यातून आले आदेश!

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल शाखेने पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचे पत्र (क्र. मह-३/प्रशा/कावि/९७/२०२६) पाठवले आहे. या पत्रात प्रस्तावित नवीन अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदार कार्यालयांबाबतची आवश्यक माहिती ‘आजच’ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी बारामती, मंचर, पंढरपूर सोबतच ‘फलटण’चा समावेश आहे, तर अप्पर तहसील कार्यालयासाठी उंब्रज, उत्तर सोलापूर, मयरे, चाकण सोबतच ‘साखरवाडी’चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कामाला वेग आला आहे.

रणजितसिंह व सचिन पाटलांचा ‘मास्टरस्ट्रोक’

फलटणला प्रशासकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी शासन दरबारी आपली ताकद पणाला लावली होती. या मागणीसाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. फलटणचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या पाहता येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी शासनाला पटवून दिले होते. त्यांच्या या राजकीय वजनामुळेच आणि अथक प्रयत्नांमुळेच आज शासनाने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे.

काय माहिती मागवली आहे?

शासनाने प्रस्तावित कार्यालयांसाठी कामाचे वाटप, अधिकार क्षेत्र, आणि मुख्यालयातील अंतर याबाबींची माहिती मागवली आहे.

  1. फलटण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय: जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्यातील विषयांचे वाटप, स्वतंत्र अधिकार, कार्यक्षेत्राचा नकाशा आणि प्रलंबित अपीलांची संख्या.
  2. साखरवाडी अप्पर तहसील कार्यालय: प्रस्तावित अनषंगिक नकाशा, कामाचा व्याप, तहसीलदार व अप्पर तहसीलदार यांच्या कामाचे वाटप.

या निर्णयाचे स्वागत करताना भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांनी सांगितले की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश येत आहे. ॲडिशनल कलेक्टर ऑफिस फलटण व ॲडिशनल तहसील ऑफिस साखरवाडी होण्यासाठी पुढील प्रोसेस सुरू झाली असून, शासनाचे परिपत्रक जारी झाले आहे. हा फलटणच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

फलटण आणि साखरवाडी येथे ही कार्यालये सुरू झाल्यास नागरिकांचा सातारा किंवा तहसील कार्यालयातील हेलपाटा वाचणार असून, प्रशासकीय कामात मोठी सुलभता येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!