
स्थैर्य, फलटण, दि. २२ सप्टेंबर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फलटण शहर आणि परिसरातील देवी मंदिरे सज्ज झाली असून, सर्वत्र उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे आणि उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्री माळजाई मंदिर परिसरात यंदा लायन्स क्लब आणि माळजाई देवस्थान उद्यान समितीने विशेष पुढाकार घेऊन परिसराचे सुशोभीकरण केले आहे. उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी स्वतः लक्ष घालून हे काम पूर्ण करून घेतले आहे, ज्यामुळे परिसराचे रूप पालटले आहे. येथे भाविकांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
फलटणचे ग्रामदैवत असलेल्या तळ्यातील देवी मंदिरातही श्री नाईक निंबाळकर देवस्थानच्या वतीने उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी दर्शन बारी उभारण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, भाविकांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
याबरोबरच, शिवशक्ती चौकातील कोल्हापूरच्या देवीचे मंदिर आणि शहरातील सर्वात जुने व जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या श्री भानूची देवी सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीनेही उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मंदिरांमध्ये देवीची विविध आकर्षक रूपे साकारण्यात येणार आहेत. शहरात विविध सार्वजनिक मंडळांनी आकर्षक आरास करून उत्सवाची शोभा वाढवली आहे.