महाविद्यालय सभागृहात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य डॉ. अभ्यंकर व नियामक मंडळ सदस्य व पत्रकार.
स्थैर्य, फलटण दि. १४ : ज्ञान हॅक (Gyan Hack) या अभिनव उपक्रमांतर्गत स्पर्धेच्या माध्यमातून विविध कंपन्या आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी यांच्या मधील ज्ञानाची देवाण-घेवाण वाढीस लागण्याबरोबर या स्पर्धेद्वारे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी विविध कंपन्यांचे प्रश्न/समस्या सोडविण्यासाठी संशोधनपर काम करणार असल्याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात Gayn Hack उपक्रमाचे उदघाटन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते अमेरिकेतून ऑनलाइन करण्यात आले, या समारंभास प्राचार्य डॉ. हेमंत अभ्यंकर,पुणे, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, सोसायटीचे खजिनदार हेमंत रानडे, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख उपस्थित होते.
GyanHack उपक्रमाचे निर्माते डॉ. अरुण जामकर यांनी अमेरिकेतून ऑनलाइन, ही संकल्पना, तिची उपयुक्तता आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिल्यानंतर फलटण अभियांत्रिकी महाविद्यालय हे या संकल्पनेचे नोडल सेंटर म्हणून कामकाज पहात आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचा नावलौकिक राज्यातच नव्हे देशभर पोहोचणार असल्याचे नमूद करीत महाविद्यालय व फलटणकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे स्पष्ट करीत शुभेच्छा दिल्या.
नोडल सेंटर म्हणून काम करताना, किंबहुना महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांशी निकट संपर्क प्रस्थापित करताना विचार, उपक्रम, कार्यक्रम याबाबत नवनवीन संकल्पनांचे आदान प्रदानातून विद्यार्थ्यांना खूप काही नवे शिकण्याची संधी लाभणार असल्याचे प्राचार्य डॉ. अभ्यंकर यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी प्रास्तविकात तंत्रज्ञानामध्ये होणारी नवनवीन संशोधने, बदलते शैक्षणिक धोरण याला अनुसरुन विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना आय. आय. टी. मुंबई या संस्थेमार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच प्राध्यापकांना मशीन लर्निंग, डीप लर्निंग, पायथोन, स्टॅटिस्टिक्स, डेटा सायन्स या विषयावर प्रशिक्षित करण्यात आले आहे, ज्यामुळे प्राध्यापक येथील प्रत्येक विद्यार्थी उत्तम अभियंता घडवू शकतात याची ग्वाही प्राचार्य डॉ. देशमुख यांनी दिली.
दर्जेदार अभियंते घडविण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व डिझाईन या विषयावर विशेष प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत, सायबर सिक्युरिटी या विषयावर EnTC विभागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी येथील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत विविध कोर्सेस तसेच नवीन सर्टिफिकेट कोर्सेस या महाविद्यालयात सुरु असल्याचे सांगतानाच DTE महाराष्ट्र व स्टेट सीईटी सेल मार्फत नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होत असून त्यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरु असल्याचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी सांगितले.