
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि. १७) शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने आज दिवसभर निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी उसळणार आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (खासदार गट) संभाव्य उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून, काही प्रभागांतील उर्वरित उमेदवार आज अर्ज दाखल करतील. तर, राजे गटाचे सर्व उमेदवार आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहे.
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी, दोन्ही प्रमुख गटांमधील नगराध्यक्ष पदाचा तेढा अद्याप सुटलेला दिसत नाही. खासदार गट आणि राजे गट या दोन्ही गटांच्या नेतृत्वाने आपापल्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे दोन्ही गटांत मोठा संभ्रम आणि उत्सुकता कायम आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत नक्की कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. गटाला लागलेल्या गळतीनंतर नेतृत्व या दोघांपैकी कोणाला संधी देणार, यावर अंतिम निर्णय होईल.
दुसरीकडे, खासदार गटाकडून माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीने नगराध्यक्षपद ‘कमळ’ चिन्हावर लढवण्याचे यापूर्वीच जाहीर केले असल्याने, यापैकी कोणत्या नेत्याला अधिकृत उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजे गटाचे पक्ष व चिन्ह कोणते?
नगराध्यक्षासोबतच राजे गटाच्या पक्ष आणि चिन्हाचा सस्पेन्सही कायम आहे. गेले काही दिवस राजे गट हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राजे गटाचे सोशल मीडिया प्रमुख अक्षय (शेठ) गायकवाड यांनी सोशल मीडियावर तसे संकेतही दिले होते.
मात्र, अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी राजे गटाचा अद्याप कोणताही जाहीर पक्षप्रवेश झालेला नाही. त्यामुळे राजे गटाची पक्ष आणि चिन्हाबाबतची अधिकृत भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. आज उमेदवारी अर्ज भरतानाच राजे गट कोणत्या चिन्हावर लढणार, हे स्पष्ट होणार आहे.
महायुतीच्या (खासदार गट) बहुतांश उमेदवारांनी अर्ज दाखल करून प्रचारात आघाडी घेतली आहे. तर राजे गटाचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंतच हे सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याने, फलटणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष निवडणूक कार्यालयाकडे लागले आहे.

