दैनिक स्थैर्य | दि. 19 एप्रिल 2023 | फलटण | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जी फलटण शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ती अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काढण्यात आली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार हा फलटणमध्ये घडला नाही किंबहुना जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आदर्शवत अशी मिरवणूक फलटणमध्ये आयोजित करण्यात आली होती, असे प्रतिपादन फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.
फलटण उपविभागीय कार्यालय, फलटण शहर पोलीस पोलीस स्टेशन व फलटण नगरपरिषद यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील, मधुकर काकडे, विजय येवले, बी. टी. जगताप, मुन्ना शेख, राजू मारुडा, सचिन अहिवळे, तेजस काकडे, लक्ष्मण अहिवळे, प्रवीण शेळके, संजय निकाळजे व संजय अहिवळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले की, मी पोलीस सेवेमध्ये रुजू झाल्यापासून बऱ्याच ठिकाणी कामकाज केले आहे. अगदी मुंबई सारख्या संवेदनशील ठिकाणी सुद्धा मी कामकाज केले आहे. एवढे वर्षे काम केले असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक एवढी नियोजनबद्ध कधीही माझ्या पाहण्यात नव्हती. एवढी नियोजनबद्ध मिरवणूक काढण्यासाठी जयंती उत्सव मंडळातील सर्वांनीच प्रशासनाला मदत केली आहे.