
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने हातावर लिहिलेल्या कथित चिठ्ठीत दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेवर विविध राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर, तिच्या हातावर लिहिलेल्या मजकुरात एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) अत्याचार केल्याचा आणि दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याच्या आरोपांचा उल्लेख असल्याचे समोर आले होते. या धक्कादायक खुलाशानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. ते म्हणाले की, ते स्वतः सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करतील.
आमदार चित्रा वाघ यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी असल्याचे सांगत, त्यांनी सातारा पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाल्याचे सांगितले. एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. त्यांनी तातडीने संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेमुळे पोलीस दलातील विकृती पुन्हा एकदा समोर आली असून, ‘रक्षकच भक्षक’ बनल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. एका महिला डॉक्टरला अशा टोकाच्या परिस्थितीतून जावे लागणे आणि त्यात पोलिसांवरच गंभीर आरोप होणे, हे अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.

