फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश


स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : फलटण येथील एका हॉटेलमध्ये (दि. २३ ऑक्टोबर) महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांना एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी तात्काळ स्थापन करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हाताच्या तळव्यावर लिहिलेल्या चिठ्ठीत, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाणे यांनी बलात्कार केल्याचा, तर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि राजकीय पक्षांकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटीची मागणी होत होती. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीदेखील या घटनेची निपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

एसआयटी म्हणजे काय?

‘एसआयटी’ (SIT) म्हणजे ‘विशेष तपास पथक’ (Special Investigation Team). जेव्हा एखादे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे, संवेदनशील किंवा महत्त्वाचे असते, तेव्हा सखोल आणि विशिष्ट तपासासाठी शासनाकडून अशा पथकाची स्थापना केली जाते. यामध्ये विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असतो, जे थेट उच्च अधिकाऱ्यांना आपला अहवाल सादर करतात.


Back to top button
Don`t copy text!