
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑक्टोबर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर मुख्य संशयित असलेला पोलीस उपनिरीक्षक (PSI) फरार झाला आहे. या गंभीर घटनेच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर या फलटणमध्ये ठाण मांडून आहेत, तर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे.
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने हातावर लिहिलेल्या कथित मजकुरात पोलीस अधिकारी प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संशयित प्रशांत बनकर याला शुक्रवारी, दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अटक केली आहे. बनकर हा पोलीस कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला आज, शनिवारी फलटण येथील न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, ज्या पोलीस उपनिरीक्षकावर महिला डॉक्टरने अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे, तो फरार झाला आहे. त्याचा मोबाईल फोन देखील बंद येत असून, त्याला पकडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाचे एक विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला डॉक्टर बुधवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी (म्हणजेच गुरुवार, दि. २३ च्या पहाटे) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शहरातील एका हॉटेलमध्ये एकट्याच आल्या होत्या. त्यानंतर गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनला कळवली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी शुक्रवारी तातडीने फलटणला भेट दिली आणि तपासाची सूत्रे हाती घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक कडुकर या अजूनही फलटणमध्येच थांबून असून, तपासाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
उद्या, रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या अगदी पूर्वी घडलेल्या या गंभीर आणि संवेदनशील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यादरम्यान या प्रकरणावर काय भाष्य करणार आणि तपासासंदर्भात काही निर्देश देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

