
स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑक्टोबर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य संशयित आरोपी असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने हा अखेर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर बदने फरार झाला होता आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. त्याच्या अचानक हजर होण्यामुळे प्रकरणाच्या तपासाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या कथित चिठ्ठीत पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या धक्कादायक खुलाशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि बदने फरार झाला होता. फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती. सातारा जिल्हा पोलीस दलाने बदनेच्या शोधासाठी पंढरपूर आणि पुणे येथेही पथके रवाना केली होती.
मात्र, पोलिसांना गुंगारा देणारा बदने काल रात्री स्वतःहून फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याच्या अटकेमुळे आता पोलीस त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात सखोल चौकशी करू शकणार आहेत. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर आणि संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर, बदनेवर पोलिसांचा दबाव वाढला होता. त्याच्या हजर होण्यामुळे आता या प्रकरणातील सत्य समोर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस आता बदनेची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया पार पाडतील.

