
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑक्टोबर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भीम आर्मी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आणि फरार संशयित आरोपीला अटक न केल्यास, फलटण दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही भीम आर्मीने दिला आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने नुकतीच आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी तिने हातावर लिहिलेल्या कथित मजकुरात दोन पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर, भीम आर्मी संघटनेच्या वतीने अजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, ऋषिकेश गायकवाड, अजय जगताप, राहुल पवार, योगेश भोसले, सोजल भोसले, विजय कांबळे, सनी पवार, भाग्यश्री कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय दंडाधिकारी (प्रांतअधिकारी) यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, दोन पोलिसांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळेच महिला डॉक्टरला आपले आयुष्य संपवावे लागले. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग पाहता, तपासात कोणताही दबाव येऊ नये यासाठी हा तपास तात्काळ CID कडे वर्ग करावा, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा दुःखात असताना, मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असणे हे चिंताजनक आहे, असे संघटनेने म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री फलटण दौऱ्यावर येत आहेत. तोपर्यंत फरार आरोपीला अटक न झाल्यास, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाईल, असा स्पष्ट इशारा भीम आर्मीने दिला आहे.
घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, भीम आर्मीने पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

