
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। फलटण । फलटण शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक प्रभागाला ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रभागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरील निधी मंजूर निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रत्येक प्रभागाला मिळणाऱ्या ५० लाख रुपयांचा निधी गटर, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण यासारख्या मूलभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, फलटण शहरात नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
सोमवार पेठ प्रभाग क्रमांक एक मधून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. या दौऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दौऱ्यात माजी नगरसेवक अशोकराव जाधव, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहूल निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण शहराच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात असून, येत्या काळात शहरातील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.