
दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण आगारात नुकत्याच नवीन १० एस.टी. बस दाखल झाल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. लवकरच अजून १० नवीन बस दाखल होणार आहेत. त्याबरोबरच नवीन २१ इलेक्ट्रिक बसही फलटण आगारासाठी मंजूर असून त्यासाठी लागणार्या चार्जिंग स्टेशनही ‘वर्क ऑर्डर’ निघाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
मात्र, मार्चमध्ये सुमारे १० ते १२ बस स्क्रॅपमध्ये जाणार असल्याने फलटण आगाराला बसेसची कमतरताही जाणवू शकते असे मत सुद्धा प्रवासी व्यक्त करीत आहेत.
नुकत्याच दाखल झालेल्या नवीन दहा बस या मुंबई परेल २, बोरिवलीसाठी २, मलकापूरला २ व इतर बसेस स्थानिक ठिकाणी चालवल्या जात आहेत. तसेच आणखी नवीन १० बस फलटण आगाराला मिळणार आहेत. त्याबरोबरच २१ इलेक्ट्रिक बस फलटण आगारासाठी मंजूर असून त्या सातारा आगारात आहेत. या इलेक्ट्रिक बससाठी लागणारे ‘चार्जिंग स्टेशन’चे काम होण्यासाठी ‘वर्क ऑडर्र’ही निघाली असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या फलटण आगारात ९० बस आहेत. फलटण आगाराला एकूण १०५ बसची आवश्यकता आहे. नवीन बस दाखल होणार असल्या तरीही मार्च महिन्यात १० ते १२ स्क्रॅपमध्ये जाणार असल्याने पुन्हा बसेसची संख्या ‘जैसे थे’च राहणार आहे. त्यामुळे एवढ्या नवीन बस मिळूनही या आगाराला बसची कमतरता जाणवणार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
मुदत संपलेल्या बसेस स्क्रॅपमध्ये जात असल्याने नवीन बस दाखल होऊनही फलटण आगाराला एसटी बसची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी बसेसची गरज पडणार आहे. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे.