शंकर मार्केट हल्ल्यातील दोन गुंडांना अखेर ठोकल्या बेड्या! २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; उर्वरित आरोपींच्या शोधासाठी फलटण शहर पोलिसांची धावपळ


फलटणच्या शंकर मार्केटमध्ये गाडी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून दोन भावांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २४ फेब्रुवारी : फलटण शहरातील गजबजलेल्या शंकर मार्केट परिसरात रविवारी रात्री गाडी वेगात चालवू नका, असे सांगितल्याच्या रागातून दोन भावांवर सत्तूर आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळक्यातील दोन संशयित गुंडांना अखेर फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे (दोघेही रा. ब्राम्हणगल्ली, फलटण) अशी या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावांची नावे आहेत.

अशी घडली होती थरारक घटना:

दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अनिल हिरणवाळे हे आपले गॅरेज बंद करून बाहेर थांबले होते. त्यावेळी गोसावी वस्तीतील ७ ते ८ तरुण वेगाने आणि मोठ्याने आवाज करत त्यांच्या गॅरेजसमोरून गाड्या चालवत होते. “गाडीचा धक्का इतर कोणाला लागू नये म्हणून एवढा आवाज करून वेगात गाड्या का चालवता, कोणाला तरी गाडी धडकेल,” अशी समज अनिल यांनी त्यांना दिली होती.

याच गोष्टीचा राग मनात धरून त्या टोळक्याने थोड्या वेळाने परत येऊन अनिल आणि त्यांचा भाऊ संतोष यांच्यावर लाकडी दांडके, हाताने आणि लोखंडी सतुराने सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि तेथून पोबारा केला.

या दोन आरोपींना ठोकल्या बेड्या!

या घटनेनंतर संपूर्ण फलटण शहरात संतापाची लाट उसळली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध मंडळांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना निवेदन देऊन गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींपैकी खालील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे:

१) संदीप विठ्ठल जाधव (वय २० वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, मलठण, ता. फलटण)
२) सुनिल ऊर्फ सतिश राजु मोरे (वय २० वर्षे, रा. कुंभारभट्टी, मलठण, ता. फलटण)

२६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; इतरांचा शोध सुरू

अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना आज (दि. २४ फेब्रुवारी) फलटण येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या दोन्ही आरोपींना दि. २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PC) मंजूर केली आहे.

या प्रकरणात अजूनही काही संशयित आरोपी पसार असून, फलटण शहर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!