पुण्याच्या हॉटेल व्यावसायिकाला फलटणमध्ये ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून लुटले! खोट्या बलात्काराची धमकी देत उकळली खंडणी; पोलिसांकडून ९ सराईतांसह एका महिलेला अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे (भोर) येथील एका हॉटेल व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवरून गोड बोलून फलटणमध्ये ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ४० लाखांची खंडणी मागत लुटणाऱ्या सराईत टोळीचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून ३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २० फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील एका हॉटेल व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवरून ‘हाय’ (Hi) असा मेसेज करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून (हनी ट्रॅप) फलटणमध्ये बोलावून घेत लुटल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन, मारहाण करत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि २० तोळे सोन्याची चेन असा मोठा ऐवज लुटण्यात आला होता. या खळबळजनक प्रकरणात फलटण शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्यपूर्ण तपास करत ९ सराईत आरोपींसह एका महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३२ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

असा रचला ‘हनी ट्रॅप’चा सापळा…

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद काशिनाथ दळवी (रा. कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) हे हॉटेल व्यावसायिक आहेत. दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एका महिलेने त्यांच्या मोबाईलवर ‘Hi’ असा मेसेज केला. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल करून गोड बोलत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास या महिलेने त्यांना भेटण्याच्या बहाण्याने फलटण येथील बुधवार पेठेतील एका फ्लॅटवर बोलावून घेतले.

मारहाण करत ४० लाखांच्या खंडणीची मागणी

दळवी हे फ्लॅटवर पोहोचल्यानंतर तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी एकच कटकारस्थान रचले. त्यांनी दळवी यांना ‘तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवतो’ अशी भयंकर धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून दळवी यांना अश्लील शिवीगाळ आणि बेदम मारहाण करत त्यांच्याकडे थेट ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

जिवाच्या भीतीने दळवी यांनी एटीएम आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १ लाख ९५ हजार रुपये आरोपींना काढून दिले. त्यानंतर आरोपींनी त्यांना फलटणमधून पुणे रस्त्याला सोडण्याच्या बहाण्याने नेले आणि वाटेत गाडी अडवून त्यांच्या गळ्यातील तब्बल ३० लाख रुपये किमतीची २० तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली.

पोलिसांची धडक कारवाई; ‘या’ आरोपींच्या आवळल्या मुसक्या

या भयंकर प्रसंगानंतर फिर्यादी आनंद दळवी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(५), ३०८(६), ३०९(६), १२६, ६१(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल केले.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अरविंद काळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे विविध पथके तयार करून या गुन्ह्यातील खालील आरोपींना शिताफीने अटक केली:

१) साहिल रवी तारे (रा. दत्तनगर, फलटण)
२) वैभव बाळासो सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण)
३) रोहन नवीन काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण)
४) विनायक बाळासो जाधव (रा. ठाकूरकी, ता. फलटण)
५) राज राम बोके (रा. मंगळवार पेठ, फलटण)
६) विजय दत्तू ननवरे (रा. झिरपे गल्ली, फलटण)
७) तुषार ऊर्फ गदया संजय ननवरे (रा. झिरपे गल्ली, फलटण)
८) सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे)
९) राहुल रामचंद्र जगताप (रा. कसबा पेठ, फलटण)
१०) एक महिला आरोपी.
(टीप: कायदेशीर बाबींनुसार महिला आरोपीचे नाव वगळण्यात आले आहे.)

३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या सर्व सराईत आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला २९ लाख ५२ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ३२ लाख ७२ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील ५ आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

अटक केलेल्या सर्व आरोपींना दि. २० फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!