६ लाखांच्या कर्जापोटी हडपली कोट्यवधींची जमीन! पुण्याच्या सावकाराचा मुरूम येथील तरुणाला गंडा; बनावट सह्या करून परस्पर केले खरेदीखत


मुरूम (ता. फलटण) येथील एका डेकोरेशन व्यावसायिकाला व्यवसायासाठी घेतलेले ६ लाखांचे कर्ज चांगलेच महागात पडले आहे. पुण्याच्या एका सावकाराने बनावट सह्या आणि खोटे साक्षीदार उभे करून कोट्यवधी रुपयांची शेतजमीन परस्पर स्वतःच्या नावावर करत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्थैर्य, मुरूम, दि. २० फेब्रुवारी : व्यवसाय वाढवण्यासाठी पुण्यातील एका व्यक्तीकडून घेतलेले ६ लाख रुपयांचे कर्ज मुरूम (ता. फलटण) येथील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. कर्जाच्या बदल्यात जमिनीचा केवळ करारनामा करण्याऐवजी, फसवणूक करून वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) लिहून घेत, त्याआधारे परस्पर कोट्यवधी रुपयांची जमीन हडप केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खोट्या सह्या करून बोगस खरेदीखत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अक्षय नारायण पवार (वय २७ वर्षे, व्यवसाय – इव्हेंट मॅनेजमेंट, रा. मुरूम, ता. फलटण) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

असा रचला फसवणुकीचा कट…

अक्षय पवार हे २०१७ पासून पुण्यात डेकोरेशनचा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख अशोक ईराप्पा भंडारी (रा. पुणे) याच्याशी झाली होती. व्यवसाय वाढवण्यासाठी अक्षय यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अशोक भंडारी याच्याकडून ६,००,०००/- (सहा लाख रुपये) व्याजाने घेतले होते. या बदल्यात जमिनीचा करारनामा करून देण्याचे ठरले होते.

मात्र, करारनामा करण्याऐवजी आरोपी अशोक भंडारी याने अक्षय यांच्याकडून २१ ऑगस्ट २०२४ रोजी केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर फसवणूक करून वटमुखत्यारपत्र लिहून घेतले आणि त्यानंतर ६ लाख रुपये खात्यावर पाठवले. अक्षय यांनी सप्टेंबर महिन्यात २५ हजार रुपये व्याजाचा हप्ताही दिला होता, मात्र त्यानंतर व्यवसाय मंदावल्याने त्यांना हप्ते देता आले नाहीत.

बनावट सह्या अन् २० लाखांचा खोटा व्यवहार!

मार्च २०२५ मध्ये आरोपी अशोक भंडारी हा दोन साथीदारांसह मुरूम येथे आला आणि ‘पैसे द्या नाहीतर जमीन नावावर करून घेईन,’ अशी धमकी देऊन गेला. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा होळच्या मंडल अधिकाऱ्यांची नोटीस आली, तेव्हा पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला.

आरोपी अशोक भंडारी याने त्याच वटमुखत्यारपत्राचा गैरवापर करत २३ एप्रिल २०२५ रोजी फलटण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मुरूम येथील गट नं. ४१/५ (क्षेत्र १ हेक्टर ५५ आर) या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीचे स्वतःच्याच नावे खरेदीखत करून घेतले होते. विशेष म्हणजे, या खरेदीखतामध्ये २०,००,०००/- (वीस लाख रुपये) दिल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला असून, दस्तऐवजाच्या पान क्र. १४ वर अक्षय आणि त्यांच्या वडिलांच्या खोट्या सह्या आणि अंगठे मारण्यात आले आहेत. यासाठी वैभव एस. कामठे आणि दीपक चव्हाण (रा. धायरी, पुणे) यांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्या आहेत.

दुचाकीही पळवली; पोलिसांत दाद न मिळाल्याने न्यायालयात धाव

व्याजाचा दुसरा हप्ता दिला नाही या कारणावरून आरोपीने अक्षय पवार यांची निळ्या रंगाची ॲक्टिव्हा गाडी (MH-12-NN-9442) जबरदस्तीने पळवून नेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अक्षय यांनी २१ जुलै २०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर ४ ऑगस्ट २०२५ रोजी सातारा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने, अखेर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी अक्षय पवार यांनी थेट न्यायालयात सत्यप्रतिज्ञेवर धाव घेतली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!