
फलटणच्या शंकर मार्केटमध्ये झालेल्या हल्ल्याचे मूळ शहरात फोफावलेले गांजा, गुटखा आणि अवैध धंदे असल्याचे समोर आले आहे. धाडीपूर्वीच टीप मिळत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असून, संतप्त नेत्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २४ फेब्रुवारी : फलटण शहरातील शंकर मार्केट येथे रविवारी रात्री जो थरार आणि रक्तरंजित प्रकार घडला, त्याचे मूळ कारण आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागले आहे. केवळ गाडी वेगात चालवण्यावरून हा वाद झाला नसून, शहरात सर्रासपणे सुरू असलेले अवैध धंदे, गुटखा, गांजा आणि इतर अमली पदार्थांची खुलेआम विक्री, हेच या वाढत्या गुन्हेगारीचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व काळ्या धंद्यांची पोलिसांना पूर्ण माहिती असूनही कडक कारवाई का होत नाही? हा सर्वात मोठा आणि संतप्त सवाल आता फलटणकर विचारत आहेत.
ज्या ठिकाणी ही अवैध विक्री सुरू असते, तिथे धाड टाकण्यापूर्वीच या तस्करांना आणि गुंडांना ‘टीप’ कशी मिळते? असा खळबळजनक आरोप आता होऊ लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा संयम सुटून त्यांचे मोठे जनआंदोलन उभे राहिल्यावरच आता पोलिसांना जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भयंकर परिस्थितीमुळे शहरवासीयांना आता निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या ‘डॅशिंग’ कार्यकाळाची तीव्रतेने आठवण येत आहे.
“कायद्याचे नाही, फक्त ‘फायद्याचे’ राज्य; पोलीस गांधारीच्या भूमिकेत!”
या घटनेवर आणि वाढत्या अवैध धंद्यांवर तीव्र संताप व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “फलटण शहरात व तालुक्यात आता कायद्याचे राज्यच राहिले नसून फक्त फायद्याचे राज्य राहिले आहे. पोलीस हे गांधारीच्या भूमिकेत गेले आहेत. आगामी काळामध्ये फलटण शहरात व तालुक्यात असणारे अवैध अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा जर बंदोबस्त केला नाही, तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र उपोषण छेडले जाईल.”
नेत्यांचा संताप आणि पोलिसांवर गंभीर आरोप:
शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवले आहे:
-
अमोल सस्ते (युवा नेते) : “शहरात जे अवैध प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, त्याची पोलिसांना पूर्ण माहिती असून पोलीसच यात सामील असल्याचा मोठा संशय आहे. फलटणला आता दोन नव्या पोलीस इमारती मिळाल्या आहेत. त्या इमारतींमधून पोलिसांनी गुंडांना अटकाव करण्याचे काम करावे.”
-
अनुप शहा (माजी विरोधी पक्षनेते, फलटण नगरपरिषद) : “या भयंकर प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलिसांनी शहरामध्ये सुरू असणारे सर्व बेकायदेशीर व्यवसाय आणि अवैध विक्री तातडीने बंद करावी. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.”
-
जगन्नाथ ऊर्फ भाऊसाहेब कापसे (ज्येष्ठ नेते) : “काल शंकर मार्केट येथे घडलेल्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी आणि त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढावी.”
फलटणकरांना आली ‘राजेंद्र मोरे’ साहेबांची आठवण!
सध्याच्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बेडके यांनी माजी पोलीस निरीक्षकांच्या कामाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “फलटण शहरात तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी जो धाक आणि वचक ठेवला होता, तो आता राहिला नाही. कायदा आणि वचक काय असतो, हे राजेंद्र मोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण फलटण तालुक्याला दाखवून दिले होते.”
“प्रशासनाची मानसिकता आणि इच्छाशक्ती हवी” : राजेंद्र मोरे
फलटणकरांच्या या भावनांबद्दल आणि सध्याच्या परिस्थितीबाबत निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी व पूर्वाश्रमीचे फलटण शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “प्रशासनाची मानसिकता कायदा कठोरपणे राबवण्याची असावी लागते. तशी इच्छाशक्ती दाखवली की त्याला लोकांची आपोआप साथ लाभते आणि फलटणकर तर चांगल्या कामासाठी नेहमी मदतच करतात.”
शंकर मार्केटच्या घटनेनंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, आता तरी पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांवर आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

