नात्याला काळीमा! घरात एकटी गाठून सख्ख्या मेहुण्याकडूनच महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध करताच दिली बदनामीची धमकी


ढवळ (ता. फलटण) येथे एका २९ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याने (मेहुण्याने) वारंवार लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नराधम मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 16 मार्च : नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील ढवळ येथे उघडकीस आली आहे. एका २९ वर्षीय विवाहित महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यानेच (मेहुण्याने) तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा आणि नात्यांमधील विश्वासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सदर घटनेची अधिकृत माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून देण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या सविस्तर फिर्यादीनुसार, याप्रकरणी दादा सोपान बिरलिंगे (रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या नराधम आरोपीविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दादा बिरलिंगे हा पीडित महिलेच्या सख्ख्या बहिणीचा नवरा आहे. तो बँड पथकात वाजंत्रीचे काम करतो. १५ डिसेंबर २०२३ रोजी तो दाळवडी येथे एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी त्याने पीडितेच्या पतीला फोन करून चहापाण्याच्या बहाण्याने ढवळ येथील त्यांच्या घरी प्रवेश मिळवला. चहापानानंतर पीडितेचे पती शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले असता, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने स्वयंपाकघरात घुसून पीडितेचा हात धरला. “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत त्याने तिला जवळ ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने धाडसाने त्याला दोन कानशिलात लगावल्याने तो तेथून पळून गेला. मात्र, आपला सुखी संसार मोडेल या भीतीने तिने हा भयंकर प्रकार त्यावेळी पतीला सांगितला नाही.

पीडितेच्या या गप्प राहण्याचा फायदा घेत आरोपीने आपला निर्लज्जपणा अधिकच वाढवला. दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीडितेचे पती सहलीला गेले असल्याने ती घरात एकटीच होती. नेमकी हीच संधी साधून आरोपी बिरलिंगे हा मोटारसायकलवरून तिथे धडकला. त्याने पुन्हा एकदा घरात घुसून महिलेच्या अंगाला झोंबाझोंबी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रखर विरोध करत स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देत तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली.

या नराधम मेहुण्याचा त्रास इथेच थांबला नाही. काही महिन्यांनंतर, २० जानेवारी २०२६ रोजी त्याने पुन्हा एकदा पीडितेच्या घरी येऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. “जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीस आणि या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले, तर मी माझ्या जिवाचे काहीतरी बरेवाईट करीन आणि तुला समाजात कायमचे बदनाम करेन,” अशी भयंकर धमकी त्याने या असहाय्य महिलेला दिली.

अखेर या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून, तसेच या नराधमाच्या दहशतीतून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी पीडित महिलेने मोठा निर्णय घेतला. तिने थेट फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आपल्या मेहुण्याविरुद्ध सर्व आपबीती पोलिसांसमोर कथन केली. सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यानेच असा नीच प्रकार केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आता या प्रकरणाचा कसून तपास करत असून, आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी जनतेमधून जोर धरू लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!