
फलटणच्या गॅरेजसमोर गाडी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून अनिल आणि संतोष हिरणवाळे यांच्यावर लोखंडी सत्तूर आणि बिअरच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपी प्रशांत जुवेकर आणि त्याच्या ७ साथीदारांवर फलटण शहर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा (BNS 109) गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २३ फेब्रुवारी : ‘गर्दीत गाडीचा आवाज कमी करा आणि वेगात चालवू नका’, असे सांगितल्याचा राग मनात धरून १०-१२ जणांच्या टोळक्याने दोन भावांवर धारदार लोखंडी सत्तूर, लाकडी दांडके आणि बिअरच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा भयंकर प्रकार रविवारी रात्री घडला होता. या घटनेप्रकरणी आता फलटण शहर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी प्रशांत सुनिल जुवेकर आणि त्याच्या इतर ७ साथीदारांवर ‘खुनाचा प्रयत्न’ (Attempt to Murder) केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जखमी अनिल विठ्ठल हिरणवाळे (व्यवसाय गॅरेज, रा. ब्राम्हणगल्ली, फलटण) यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे.
असा घडला थरार : ‘तू आम्हाला कोण सांगणार?’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिल हिरणवाळे हे आपले गॅरेज बंद करून गॅरेजसमोरच थांबले होते. त्यावेळी रस्त्यावरून गोसावी वस्तीतील ७ ते ८ मुले त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलवरून मोठ्याने आवाज करत आणि अत्यंत वेगाने गाड्या चालवत होती. गाडीचा धक्का इतर कोणाला लागू नये म्हणून अनिल यांनी त्या मुलांना, ‘एवढा आवाज करून वेगात गाड्या का चालवता, कोणाला तरी गाडी धडकेल’ अशी समज दिली.
या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी प्रशांत सुनिल जुवेकर याने, “तू आम्हांला कोण सांगणार, थांब तुला दाखवितो” अशी थेट धमकी दिली आणि तो टोळक्यासह पुढे निघून गेला.
१० मिनिटांनी आले आणि सत्तूरने वार केले!
धमकी देऊन गेल्यानंतर अवघ्या १० मिनिटांनी प्रशांत जुवेकर हा आपल्या साथीदारांसह पुन्हा फिर्यादी उभे असलेल्या ठिकाणी आला. येताच त्याने, “तू आम्हाला शहाणपण शिकवतो का?” असे म्हणत हातातील धारदार ‘लोखंडी सतुराने’ फिर्यादी अनिल यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात सपासप वार केले. तर त्याच्यासोबत असलेल्या अन्य ७ साथीदारांनी हातातील लाकडी दांडक्याने आणि बिअरच्या बाटलीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
भाऊ मदतीला आला, त्यालाही फोडले
या अचानक झालेल्या हल्ल्यादरम्यान, अनिल यांचा चुलत भाऊ संतोष रखमाजी हिरणवाळे हा मदतीला धावून आला. त्यावेळी आरोपी प्रशांत जुवेकर याने त्यालाही न सोडता लोखंडी सतुराने त्याच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. तसेच अन्य साथीदारांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून संतोष यालाही गंभीर जखमी केले.
८ जणांवर ‘खुनाचा प्रयत्न’ केल्याचा गुन्हा
या रक्तरंजित प्रकारानंतर अनिल विठ्ठल हिरणवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८/२०२६ अन्वये मुख्य आरोपी प्रशांत सुनिल जुवेकर आणि त्याच्या ७ साथीदारांवर भा.न्या.सं. (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११७(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात दहशत माजवणाऱ्या या घटनेचा पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश शिंदे हे अत्यंत बारकाईने करत आहेत.

