
दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। फलटण । फलटणची जनता आणि वकील संघटनेच्या मागणीनुसार फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात आले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून फलटण येथे जिल्हास्तरीय दिवाणी न्यायालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सात्यत्याने पाठपुरावा केला आहे.
फलटण येथे दिवाणी न्यायालय सुरू करण्याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या कडून येत्या ८ दिवसात तत्वतः मान्यता मिळणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल; असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर, तेथील न्यायव्यवस्था अधिक सुलभ आणि सुविधाजनक होणार आहे. हे न्यायालय स्थापन होण्यामुळे स्थानिक लोकांना न्याय मिळण्यासाठी सातारा येथे जाण्याची गरज पडणार नाही. यामुळे न्याय प्रक्रिया जलद होईल आणि न्यायालयीन कारभार अधिक कार्यक्षम होईल.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे फलटणच्या जनतेला या मागणीच्या पूर्ततेसाठी आशा निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे.