फलटणमध्ये राहुरी विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती, शरीरसौष्ठव स्पर्धा

महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, गोरख सरक यांची उपस्थिती


स्थैर्य, फलटण, दि. ४ नोव्हेंबर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयातर्फे, आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दिनांक ६ व ७ नोव्हेंबर रोजी श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक सभागृहात होणार आहेत.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्तीची भावना जोपासण्यासाठी या स्पर्धा होत आहेत. यामध्ये राहुरी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध कृषि व उद्यानविद्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

स्पर्धांसाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर व सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच, महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, महाराष्ट्र केसरी गोरख सरक, ऋषिकेश गरड (महाबळेश्वर श्री २०२५) आणि अक्षय मुळीक (सातारा श्री २०२४) हे मान्यवर म्हणून उपस्थित राहतील.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर आणि अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!