
दैनिक स्थैर्य । दि. 07 जुलै 2025 । फलटण । फलटण शहरातील अनेक खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये कोचिंग अकॅडमींची प्रथा वाढत असून, शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. मात्र, या अकॅडमींमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा आणि मानसिक दडपण वाढल्याचे कामगार संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सनी काकडे यांनी सांगितले. त्यांनी त्वरित कारवाईची मागणी करत, नियम न पाळल्यास आंदोलनही होऊ शकते, असा इशारा दिला आहे.
फलटणमधील अनेक खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून अधिक फी वसूल करण्यासाठी अकॅडमींचा वाढता व्यवसाय पाहायला मिळतो आहे. शाळांचे संस्थापक आणि अकॅडमी मालक हे एकत्र येऊन विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आर्थिक दडपण वाढवत आहेत. अशा अकॅडमींचा अभ्यासक्रम व शिक्षण पद्धती यावर शासनाने निश्चित केलेले नियम लागू होत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचा गंभीर निषेध काकडे यांनी व्यक्त केला.
सनी काकडे म्हणाले की, अनुदानित शाळांमध्येही अशा अकॅडमींचा प्रादुर्भाव झाला आहे, ज्यामुळे मूलभूत शिक्षणाच्या जागी शुल्कवाढीवर भर दिला जातो. शिक्षकांच्या कमतरतेतून अकॅडमी चालवण्याच्या उद्देशाने शाळा आणि अकॅडमी मालक यांनी विद्यार्थ्यांवर जास्त शुल्क आकारले जात आहे. तसेच, अकॅडमीमध्ये मुलांना अनावश्यक दबाव देऊन वर्गांमध्ये भेदभाव निर्माण होतो.
कामगार संघर्ष समिती सरकारने कोचिंग क्लासेस संदर्भातील नियमावली फलटणमधील सर्व अकॅडमींना लागू करण्याची तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकॅडमीवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबर त्यांना बंद करण्याचे आदेश द्यावेत, असेही काकडे यांनी स्पष्ट केले. नियम न पाळल्यास संघटनेकडून फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.