स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी फलटण तालुका व्यापारी महासंघ व इतर सर्व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त बैठकीत शनिवार दि. १२ ते गुरुवार दि. १७ सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यु पाळण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे, सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोना वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची बैठक
गेल्या काही दिवसापासून फलटण शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून परिस्थिती अत्याधिक गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुका व्यापारी महासंघ व इतर सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक आज (रविवार) माळजाई मंदिर, फलटण येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरीलप्रमाणे शनिवार दि. 12 ते गुरुवार दि. 17 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
संक्रमीत संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यु
फलटण शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत चालली आहे, त्यातच शहरातील व्यापारी, विविध अस्थापनात काम करणारे कर्मचारी व समाजातील अनेक लोक कोरोनाने संक्रमित होत आहेत. यासाठी खबदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातील विविध व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्य पाळण्याचे एकमताने ठरविले आहे. महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यापारी महासंघाने पुकारलेल्या जनता कर्फ्युस पाठींबा दिला आहे.
केवळ दवाखाने व औषध दुकाने सुरु राहणार
शनिवार दि. 12 सप्टेंबर पासून ते गुरुवार दि. 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यत कडक जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने चालू राहतील. या व्यतिरिक्त सर्व दुकाने व दैनंदिन व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. तरी शहरातील सर्व नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक असल्यास मास्क घालूनच बाहेर पडावे असे आवाहन व्यापारी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रशासन, पोलिस व नागरिकांना सहकार्याचे आवाहन
शासकीय अधिकारी, फलटण शहर पोलीस ठाणे व नगरपालिका प्रशासन यांना या जनता कर्फ्युस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या जनता कर्फ्युकाळात जे व्यापारी, दुकानदार जनता कर्फ्युचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असेही यावेळी एकमताने ठरविण्यात आले आहे. दि. 18 सप्टेंबर पासून सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.