दैनिक स्थैर्य | दि. १२ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण शहराजवळून वाहणार्या बाणगंगा नदीवरील संरक्षक भिंत बांधण्यासाठी सुमारे दीड कोटींचा निधी शहर विकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेला आहे. तसेच नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी नाबार्डमधून १ कोटी ९० लाखांचा निधी घेतला आहे. ही कामे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंजूर करून घेतलेली आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून ही कामे सुरू केलेली आहेत. येत्या दीड-दोन वर्षात फलटण शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. आगामी काळात शहरातील राहिलेली सर्व विकासकामे पूर्ण करून या शहराची ‘स्वच्छ व सुंदर शहर’ म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.
बाणगंगा नदी संरक्षक भिंत बांधणे, बाणगंगा नदीवरील दहावा घाट बॉक्स सेल पुलाचे कामाचे भूमिपूजन आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांची उपस्थिती होती.
आमदार सचिन पाटील पुढे म्हणाले की, फलटण शहरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी असलेली सर्व विकासकामे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, रस्ते, अंडरग्राऊंड गटारे, पाणी, इलेक्ट्रिक लाईन ही कामे लवकरच सुरू करणार असून अधिकार्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत या कामांबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेल्या बाणगंगा नदीवरील विकासकामांचा आज आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. आमदार झाल्यानंतर सचिन पाटील यांचे हे पहिलेच विकासकाम होत आहे. बाणगंगा नदी ही पवित्र नदी आहे. या नदीत फलटण शहरातील सर्व सांडपाणी मिसळत आहे. हे थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमदार सचिन पाटील व माझी चर्चा झालेली आहे.
बाणगंगा नदीच्या शुध्दीकरणासाठी अमृत २ योजनेतून सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केला आहे. धोम-बलकवडी धरणातून पाणी सोडून बाणगंगा नदी बारमाही प्रवाहित करण्याचे नियोजन आहे. तसेच आगामी काळात या नदीचे सुशोभीकरण करणार असून या नदीवर बोटिंग क्लबही सुरू करणार असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.