दैनिक स्थैर्य | दि. ०८ जानेवारी २०२४ | फलटण | फलटण शहरात वाहतूक समस्या व अतिक्रमणे या मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयानुसार, नगरपरिषदेकडून अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. या संबंधित निर्देश मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिले आहेत.
फलटण शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत आहे. साखर कारखाने व लहान-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ट्रक, ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व इतर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या समस्येची कोंडी कमी करण्यासाठी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेतला गेला आहे.
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १७९ अनुसार, सार्वजनिक रस्त्यावरील प्रक्षेपणे, अडथळे व अतिक्रमणे काढून टाकण्याचा अधिकार मुख्याधिकारी यांना आहे. या अधिनियमानुसार, मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दोन पथकांची नेमणूक करून सार्वजनिक रस्त्यावरील कोणतेही प्रक्षेपण, अतिक्रमण किवा अडथळा काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर कार्यवाहीसाठी आवश्यक जेसीबी मशीन, ट्रॅक्टर ट्रॉली, अग्निशमन वाहन व इतर आवश्यक साहित्य वाहन विभागाकडून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पथक प्रमुख व सहायक पथक प्रमुख यांचे निर्देशानुसार कामकाज करण्यात येणार आहे. पथकासोबत उपस्थित राहून अतिक्रमण काढताना ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ तांत्रिक दृष्टीने सहाय्य करणे व पथक प्रमुख ज्या सूचना देतील त्या सूचनानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करणे याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
फलटण शहरातील नागरिकांच्या वाहतूक समस्या व अतिक्रमणे यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू करण्यात येत आहे. शहराची स्वच्छता व सुंदरता राखण्यासाठी व वाहतूक समस्या दूर करण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण आहे.