
फलटण शहर वाहतूक पोलिसांनी १ ते १० मार्च दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, ट्रिपल सीट आणि मॉडिफाय सायलेन्सर असलेल्या बुलेटस्वारांवर कारवाई केली आहे. यात २०७ केसेस नोंदवत तब्बल दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 11 मार्च : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दिनांक १ ते १० मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत शहरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २०७ केसेस करण्यात आल्या असून, वाहनचालकांना १ लाख ४९ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी १५ हजार २०० रुपयांचा दंड रोख स्वरूपात वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
१४ बुलेटचे मॉडिफाय सायलेन्सर जप्त
फलटण शहरात ठिकठिकाणी ट्रिपल सीट फिरणाऱ्या, विना नंबरप्लेट दुचाकी चालवणाऱ्या आणि विशेषतः बुलेटला मॉडिफाय सायलेन्सर बसवून मोठे आवाज करत विनाकारण फिरणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत ध्वनिप्रदूषण करून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या १४ बुलेटचे १४ मॉडिफाय सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले आहेत. यामुळे शहरात कर्कश आवाज करून दहशत माजवू पाहणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच चाप बसला आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, तसेच पोलीस शिपाई ऋषिकेश खरात, पांडुरंग धायगुडे, सुरज परिहार आणि संभाजी जगताप यांनी शहरात ठिकठिकाणी उभे राहून ही कडक दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

