फलटण शहर पोलिसांची धडक कारवाई! तीन जिल्ह्यांतून तडीपार असलेल्या गुंडाचा सिनेस्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या


फलटण शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मलठण हद्दीत एका तडीपार गुंडाचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले आहे. हा गुंड सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांतून दोन वर्षांसाठी तडीपार होता.

स्थैर्य, फलटण, दि. ४ मार्च : फलटण शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत एका तडीपार गुंडाला सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आहे. या गुन्हेगाराला सातारा जिल्ह्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो विनापरवाना शहरात फिरत असताना पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.

पोलिसांना पाहून पळ काढला, अन् पाठलाग करून पकडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे एक पथक मलठण हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका मंदिराजवळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक २२ वर्षीय तडीपार गुन्हेगार थांबला होता.

पोलिसांना पाहताच त्याने स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकलवरून (MH 53 8192) तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अत्यंत सतर्क असलेल्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता या तरुणाचा पाठलाग केला आणि त्याला मोटारसायकलसह शिताफीने पकडून पोलीस ठाण्यात आणले.

दोन वर्षांसाठी होता ‘तडीपार’

या तरुणाची सखोल चौकशी केली असता, पोलीस अधीक्षक (सातारा) आणि हद्दपार प्राधिकरण यांच्या आदेशान्वये (दि. ०७ जानेवारी २०२५) त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याला संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले होते.

असे असतानाही, तडीपार आदेशाचा उघडपणे भंग करून आणि कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता त्याने शहरात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी संबंधित तडीपार गुन्हेगाराविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांवर वचक बसवणाऱ्या फलटण पोलिसांच्या या धडक कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!