फलटण शहर पोलिसांकडून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; पाच दुचाकी हस्तगत


दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहर पोलिसांनी दमदार कामगिरी करत फलटण शहरातून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करून सुमारे ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहरात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी शहर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे यांना सूचना देऊन गुन्हे तपासासाठी खास पथकाची नियुक्ती केली. त्याप्रमाणे बातमीदारामार्फत माहिती मिळवून आरोपी यश संदीप ढालपे (रा. बुधवार पेठ, फलटण) व निखिल मोरे (रा. जाधववाडी, ता. फलटण) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता मोटारसायकल चोरीचे वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ३,१२,०००/- रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पो.ह. धायगुडे, धापते, वाडकर, काळुखे, जगताप, नाळे आदींनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!