फलटण शहर व तालुक्याला हिंदू-मुस्लीम ऐक्याची मोठी परंपरा – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहर व तालुक्याला हिंदू-मुस्लीम ऐक्याची मोठी परंपरा असून या परंपरेला कोणी तोडण्याचा प्रयत्न केल्यास आपण ‘रखवाला’ म्हणून उभा राहणार आहोत. कोण काय बोलते, काय करते, याकडे कोणी लक्ष देऊ नये. ‘टायगर अभी जिंदा है’, अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण शहरातील मलटण भागात असणार्‍या मलटन मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी मलटन मस्जिद दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष जावेदभाई शेख, हाजी कादरभाई पठाण, हाजी सिकंदरभाई बागवान , रज्जाकभाई बागवान , ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, अ‍ॅड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अमोल सस्ते तसेच हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझे वडील स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्यावर मुस्लीम समाजाने खूप प्रेम केले. त्यांनी कधीही जात-पात मानली नाही. तोच वारसा आम्ही चालवत आहोत. मलटण मशिदीला माझे वडील स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे नाव दिल्याबद्दल मी मुस्लीम समाजाचा आभारी आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आल्याबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले.

फलटण शहर व तालुक्याने कधीही जातीपातीला थारा दिलेला नाही. येथील भाईचारा पूर्ण देशात अभिमानास्पद आहे. त्यामुळे येथे सर्व समाज एकोप्याने राहत असताना त्यामध्ये कोणी अडथळा आणत असेल तर आपण ‘रखवाला’ म्हणून उभा राहणार आहोत. काही मुस्लिम बांधव गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत तर मशिदचे रखवाला म्हणून हिंदू बांधव उभे असतील. ‘टायगर अभी जिंदा है’, हे तेड निर्माण करणार्‍या प्रवृत्तींनी लक्षात घ्यावे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावर्षी शिवजयंती आणि रमजान ईद एकाच दिवशी येत असून आपण सर्वांनी एकत्र मिळून शिवजयंती आणि ईद जोरदार साजरी करावी आणि देशात एकतेचा चांगला संदेश द्यावा, असे आवाहनही खा. रणजितसिंह यांनी यावेळी केले.
यावेळी मलटन मशिदीचे नामकरण ‘माजी खा. हिंदूराव नाईक निंबाळकर मस्जिद दर्गा ट्रस्ट मलटन’ असे खा. रणजितसिंह यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मलटण दर्गा येथे इफ्तार पार्टीसाठी आगमन होताच मुस्लिम बांधवातर्फे फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. लहान मुलींच्या हस्ते खा. रणजितसिंह यांना खजूर आणि फळे भरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!