
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) शाखेच्या फलटण तालुका प्रचार व पर्यटन विभागातर्फे नुकतीच दोन दिवसीय धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते. १९ व २० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) येथे आयोजित या सहलीत फलटण तालुक्यातील ४० बौद्ध उपासक-उपासिका आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या दरम्यान अजिंठा-वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली.
सहलीच्या पहिल्या दिवशी, १९ ऑक्टोबर रोजी, फर्दापूरजवळील ‘धम्माचल’ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमला भेट देण्यात आली. संस्थेचे सदस्य भंते बोधिधम्मा यांनी उपस्थित सर्वांना त्रिसरण पंचशील दिले व संस्थेच्या धम्म कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांना भेट देऊन तेथील बौद्ध लेण्यांचा इतिहास, कलात्मकता आणि धम्म संदेश समजून घेण्यात आला. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत कोरलेल्या या एकूण ३० लेण्यांमधून हीनयान आणि महायान बौद्ध परंपरेचे दर्शन घडले.
हीनयान लेण्यांमध्ये बुद्धाची प्रतिमा नसून धम्मचक्र, कमळ, रिकामा सिंहासन, बोधिवृक्ष अशा प्रतीकांमधून बुद्धत्व दर्शवले आहे. या लेण्या साध्या आणि ध्यान केंद्रित आहेत. तर महायान लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती, बोधिसत्वांची शिल्पे आणि जातक कथा व बुद्ध जीवनावरील भित्तिचित्रे आढळतात. लेणी क्रमांक १, २, १६, १७, १९ आणि २६ यांसारख्या लेण्यांमधील कलात्मकता आणि त्यातून मिळणारा त्याग, करुणा व प्रज्ञेचा संदेश उपस्थितांनी अनुभवला.
याच दिवशी पूज्य भिक्खू करुणानंद यांच्या ‘महाथेरो’ पदवी समारंभास आणि कठिण चिवरदान धम्म सोहळ्यास सर्वजण उपस्थित राहिले. यावेळी भिक्खू करुणानंद यांनी लवकरच धम्म प्रचार आणि प्रसारासाठी फलटण तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात येण्याची इच्छा व्यक्त केली व सर्वांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे उद्घाटक, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात भूमिका मांडली आणि धम्म कार्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले.
सहलीच्या दुसऱ्या दिवशी, २० ऑक्टोबर रोजी, वेरूळ लेण्यांना भेट देण्यात आली. येथे बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरेतील शिल्पकलेचा अद्भुत संगम उपस्थितांनी अनुभवला. जगप्रसिद्ध कैलास लेणी (क्र. १६) आणि १ ते १२ क्रमांकाच्या बौद्ध लेण्या पाहण्यात आल्या. या बौद्ध लेण्यांमधून विहार, चैत्यगृह, ध्यानस्थ बुद्ध आणि बोधिसत्त्वांच्या मूर्तींद्वारे महायान परंपरेचे दर्शन घडले. विशेष प्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मा लेणीमध्ये (लेणी क्र. १०) लाकडी तुळईसारखी दिसणारी छताची रचना आणि ध्यानस्थ बुद्धमूर्ती पाहून पाचव्या ते सातव्या शतकातील कलात्मक वारसा अनुभवण्याची संधी मिळाली. याच लेणीमध्ये सर्वांनी सामुदायिकरित्या त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण व भीम स्तुती पठण केले आणि थाई भिक्खूंना वंदन केले. यानंतर ‘दख्खनचा ताजमहल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्थळालाही भेट देण्यात आली.
सहलीच्या समारोपापूर्वी औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी संबंधित स्थळांना भेट देण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेश कमान (नामांतर लढ्याची आठवण), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय आणि नागसेन वन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेला पवित्र बोधिवृक्ष व बुद्ध मूर्ती यांचा समावेश होता. या स्थळभेटींमधून आंबेडकरांचे कार्य, संघर्ष आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
या दोन दिवसीय धम्म सहलीतून इतिहास, कला, धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सहलीसाठी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासो मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. सहलीच्या यशस्वीतेसाठी राज्य संघटक दादासाहेब भोसले, तालुकाध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन विभागाचे रामचंद्र मोरे, अमोल काकडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले.

