स्थैर्य, फलटण : फलटण व परिसरातील डॉक्टर्स आणि रुग्णांची रक्ताची गरज भागविताना दर्जेदार सेवा देण्याबरोबर फलटण रक्तपेढीची विकासात्मक वाटचाल प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहेत.
फलटण मेडिकल फौंडेशन संचलित येथील रक्तपेढीने उभारलेल्या कंपोनंट लॅब विषयी, त्यातून मिळणार्या नवीन सेवा, सुविधा व त्याचे फायदे याविषयी माहिती देणार्या पुस्तिकेचे प्रकाशन श्रीमंत संजीवराजे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी सदगुरु व महाराजा संस्था समुहाचे प्रमुख, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, अरविंद मेहता विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. फाऊंडेशनचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.
कंपोनंट लॅब मुळे एकच रक्ताची बाटली तीन रुग्णांची गरज भागवू शकेल ही अत्यंत महत्वाची बाब असून त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देता येईल याची ग्वाही देतानाच गेली सलग 25 वर्षे दर्जेदार व सस्मित सेवा देणार्या, समाजात चांगले स्थान निर्माण केलेल्या या रक्त पेढीची प्रगती होत राहो अश्या शुभेच्छा देत माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थेची जागेची गरज दूर करण्याबरोबर या संस्थेला सतत मदत केल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर निदर्शनास आणून दिले.
वाढती लोकवस्ती आणि वाढते विविध आजार लक्षात घेता कंपोनंट लॅबचा निर्णय योग्यवेळी घेतल्याबद्दल धन्यवाद देत आता रक्त संकलन वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी शहरातील स्वयंसेवी वृत्तीच्या आणखी काही लोकांना सोबत घेऊन दरमहा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याची आवश्यकता नमूद करतानाच रक्त दात्याला आठवणीत राहील किंबहुना आपण केलेल्या रक्तदानाबद्दल झालेला सन्मान किंवा भेट वस्तुविषयी त्यांना अभिमान वाटला पाहिजे, इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल अशी भेट वस्तू रक्तदात्याला देऊन त्याचा यथोचित सन्मान करण्याची मागणी दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी बोलताना केली.
प्रारंभी डॉ. बिपीन शहा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात रक्त पेढीच्या विस्तार प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. देशपांडे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.