
फलटणमध्ये राजे गटाला गळती लागली असून भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वाचा सविस्तर.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतरही गटाची गळती थांबताना दिसत नाही. माजी खासदार तथा भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जोरदार ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. यामध्ये माजी नगरसेवक, व्यापारी आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने राजे गटाला मोठे धक्के बसले आहेत.
बालमित्र आठ वर्षांनी पुन्हा एकत्र
राजकारणापासून गेली आठ वर्षे अलिप्त असलेले फलटणचे प्रसिद्ध उद्योजक उमेश निंबाळकर यांनी आपले बालमित्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. “आम्ही मित्र पुन्हा एकत्र येत आहोत,” असे सांगत त्यांनी भाजपला साथ दिली. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेश निंबाळकर यांचे आलिंगन देऊन पक्षात स्वागत केले. या मैत्रीच्या पुनरागमनाची चर्चा शहरात रंगली आहे.
माजी नगरसेवक आणि व्यापाऱ्यांचा ‘रामराम’
फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोर घोलप आणि माजी नगरसेविका शशिकला घोलप यांनी राजे गटाला रामराम ठोकत समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या अनुभवाचा फायदा महायुतीला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक ‘स्वागत कोल्ड्रिंक्स’चे संचालक शेख बंधू (शगीर, समीर, अश्फाक शेख) आणि प्रभाग क्रमांक ७ मधील कुंभार कुटुंबियांनी (गजानन, गोरख, विजय, सुरज, अमोल कुंभार) राजे गटाची साथ सोडत महायुतीत प्रवेश केला.
सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिलांचा प्रवेश
समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणात अग्रेसर असलेल्या ॲड. कांचनकन्होजा खरात यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. ‘झुणका भाकर’ उपक्रम, उपजिल्हा रुग्णालयाचे पुनर्जीवन आणि महिला रोजगार यांतील त्यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडीला बळ मिळाले आहे. तसेच प्रभाग ३ व ४ मधील राजेंद्र बाळासो घाडगे आणि जय शिवशक्ती गणेश उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष अतुल निंबाळकर यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.
तरुण उद्योजक आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी सोबत
प्रभाग क्रमांक ५ मधील युवा उद्योजक योगेश कापसे यांनी समर्थकांसह पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे, प्रभाग ३ आणि ४ मधील ‘बालशिवाजी गणेशोत्सव मंडळा’चे प्रमुख पदाधिकारी मुकेश पवार, स्वप्नील देंगे, दुर्गेश हेंद्रे आणि राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे मंडळाचे कार्याध्यक्ष सनी भोईटे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्या आमदार सचिन पाटील आणि श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा सिलसिला सुरूच असून, यामुळे महायुतीची ताकद शहरात वाढत असल्याचे चित्र आहे.

