दैनिक स्थैर्य | दि. 28 सप्टेंबर 2024 | फलटण | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम हे राबिविले जात आहेत. गत काही वर्षात फलटणच्या चहू बाजूला बाजार समितीच्या मालकीचे पेट्रोल पंप सुरु करण्यात आले आहेत; त्यामधील काही अतिशय उत्कृष्ट सुरु आहेत. आगामी काही महिन्यात इतर ठिकाणी सुद्धा सुरु होणार आहेत. यासोबतच तरडगाव येथे श्रीमंत रघुनाथराजे हे फलटण बाजार समितीचे थ्री स्टार हॉटेल सुरु करत आहेत; या सर्व बाबींचा विचार करता फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही श्रीमंत रघुनाथराजेंच्या कल्पक नेतृत्वामुळे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अव्वल असल्याचे मत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दिपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले कि; फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हायटेक सुविधा ह्या शेतकऱ्यांना पुरवणे गरजेचे आहे; व आता सुद्धा विविध हायटेक सुविधा त्यामध्ये गहू, ज्वारी किंवा इतर शेतमालाचे शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे माहिती बाजार समिती देत आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन श्रीमंत रघुनाथराजे हे फलटण बाजार समिती आदर्शवत चालवतील; असा विश्वास संपूर्ण तालुक्याला आहे.
तरडगावमध्ये बाजार समिती थ्री स्टार हॉटेल सुरु करणार : श्रीमंत रघुनाथराजे
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती हि आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या तरडगाव या ठिकाणी थ्री स्टार हॉटेल सुरु करणार आहे. फलटण व लोणंद या दोन्ही एमआयडीसीच्या मध्यावर हॉटेल सुरु केल्याने नक्कीच औद्योगिक पट्ट्याला याचा फायदा होणार आहे. श्रीमंत रामराजे यांच्यामुले फलटण तालुक्यात दुसरी हरित क्रांती झाली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. यामुळेच फलटण बाजार समिती हि विविध उपक्रम हे सक्षमपणे राबवते आहे. देशातील पणन कायद्यानुसार बाजार समिती हि हॉटेल व्यवसाय सुरु करू शकते. याचे उदाहरण हे गुजरात राज्यात आहे; त्याच धर्तीवर फलटण बाजार समिती हि आता येणाऱ्या काळात थ्री स्टार हॉटेल सुरु करणार आहे; असे मत सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.