दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । पर्यावरणाचा ढासळता समतोल, त्याचा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्याबरोबर आरोग्य सुधारण्यासाठी शक्य असेल तर स्वयंचलीत वाहनांऐवजी पायी चालणे व सायकल वापरणे अत्यंत उपयुक्त असून त्या पार्श्वभूमीवर फलटण सायकल असोसिएशनच्या माध्यमातून सुरु असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण तालुका सायकल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या फलटण – बारामती – फलटण अश्या एकूण 57 किलोमीटर सायकल राईडला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सायकल राईडमध्ये तब्बल ७१७ सायकलस्वारांनी सहभाग घेऊन ही सायकल राईड यशस्वी केली.
आज रविवार दि. 10 रोजी सकाळी सहा वाजता फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे यांच्या शुभहस्ते या सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. हेमंत मगर, डॉ. संजय राऊत, डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य यांच्यासह फलटण सायकल असोसिएशन संयोजन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह मान्यवर या वेळी फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते.
या सायकल राईडचे वैशिष्ट्य म्हणजे या सायकल राईडमध्ये आठ वर्षाची कु. स्वरा भागवत तर 64 वर्षाचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत मिसाळ यांनी सहभाग घेऊन राईड पूर्ण केली.
सायकल राईडमध्ये बारामती, लोणंद, कोरेगाव व फलटण तालुक्यातून आणि सायकलस्वार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. प्रगती कापसे, नगरसेविका सौ. दिपाली निंबाळकर, नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, नगरसेविका सौ.जोत्स्ना शिरतोडे, नगरसेविका रंजना कुंभार, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अजय माळवे, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, भाऊसाहेब उर्फ जगन्नाथ कापसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
अस्थीरोग तज्ञ डॉ. मयूर फरांदे यांनी ही स्पर्धा 57 KM धावत जाऊन पूर्ण केली तर कु. स्वरा भागवत या छोट्या मुलीने या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविताना इतरांना प्रोत्साहन दिले.
मुधोजी क्लब मैदानावर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल देवून फलटण सायकल असोसिएशनच्यावतीने सर्वांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.