फलटण बाजार समितीच्या विरोधात गाळेधारकांचे साखळी उपोषण सुरू; रणजितदादांचा उपोषणाला पाठिंबा


स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑक्टोबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने लादलेली अन्यायकारक भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्व गाळेधारकांनी आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गाळेधारकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला व याप्रकरणी तोडगा काढण्याचे आवाहन केले.

यावेळी उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “बाजार समितीने गाळेधारकांवर लादलेली भाडेवाढ अत्यंत अन्यायकारक आहे. खासगीपेक्षाही जास्त दराने वसुली करण्याचा हा प्रकार असून, भारतीय जनता पार्टी आणि महायुती गाळेधारकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.” दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात कोणाच्याही नावाचा शिमगा न होता, यावर सामंजस्याने तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी बाजार समितीच्या चेअरमन यांना केले. “एकाही गाळ्याला धक्का लागू न देण्याची जबाबदारी आमची आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

संघर्ष समितीचे संस्थापक ॲड. नरसिंह निकम यांनी सांगितले की, “बाजार समितीचे सर्वच्या सर्व गाळेधारक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या अन्यायकारक भाडेवाढीविरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांपासून ते बाजार समितीपर्यंत सर्वांना सह्यांचे निवेदन दिले आहे. जोपर्यंत ही भाडेवाढ रद्द होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील.”

या आंदोलनामुळे बाजार समिती आणि गाळेधारक यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला असून, आता यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!