
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपर मार्केटमधील गाळे भाडेवाढीचा वाद आता राज्याच्या पणन संचालनालयापर्यंत पोहोचला असून, यावर तोडगा काढण्यासाठी पणन सहसंचालकांनी येत्या 28 ऑक्टोबर रोजी पुण्यात संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी बाजार समितीचे पदाधिकारी आणि गाळेधारकांचे प्रतिनिधी ॲड. नरसिंह निकम यांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने सुपर मार्केटमधील गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही भाडेवाढ अन्यायकारक असून, बाजार समितीकडून सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप करत काही गाळेधारकांनी या निर्णयाला विरोध केला होता. गाळेधारकांच्या वतीने ॲड. नरसिंह निकम यांनी याबाबत पणन संचालनालयाकडे निवेदन सादर करून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत, पणन सहसंचालक (पणन) रविकुमार दराडे यांनी दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेण्यासाठी दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथील पणन संचालनालयाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.
दरम्यान, बाजार समितीने आपली भूमिका स्पष्ट करताना, ही भाडेवाढ नियमानुसारच असून गाळेधारकांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. आता या बैठकीत काय तोडगा निघणार, याकडे सर्व गाळेधारकांचे लक्ष लागले आहे.