फलटण विमानतळाचा मार्ग मोकळा; “ती” याचिका न्यायालयाने फेटाळली, रणजितसिंहांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार


फलटण विमानतळ रद्द करण्यासाठी दाखल केलेला दावा सातारा न्यायालयाने फेटाळला आहे. वादींनी केस चालवण्यात स्वारस्य न दाखवल्याने हा निर्णय झाला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. ०४ डिसेंबर : फलटणच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नियोजित विमानतळ उभारणीतील कायदेशीर अडथळा आता दूर झाला आहे. विमानतळाची जमीन परत मिळावी आणि प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी दाखल केलेला दावा सातारा दिवाणी न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे फलटणचे विमानतळ होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यासाठी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.

नेमके प्रकरण काय?

फलटणमध्ये विमानतळ उभारणीसाठी हालचाली सुरू असतानाच, या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू होता. ‘स्व. विक्रमसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर विरुद्ध महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’ (R.C.S. No. 392/2015) या नावाने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “आम्ही विमानतळाची मागणी केली होती, परंतु विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे विमानतळ रद्द व्हावे आणि ही संपूर्ण मालमत्ता कुटुंबीयांच्या नावाने व्हावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.”

वादींची न्यायालयात दांडी; दावा निकाली

सातारा येथील दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व्ही. पी. पाटील यांनी २० नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार हा दावा फेटाळण्यात (Dismissed in Default) आला आहे. न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्यानुसार:

  • वादींनी केस पुढे चालवण्यात कोणतेही स्वारस्य (Interest) दाखवले नाही.

  • वादींच्या वकिलांनी स्वतःचे वकालतनामा रद्द केले होते.

  • न्यायालयाने आणि नवीन वकिलांनी वारंवार नोटीस देऊनही वादी न्यायालयात हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी सहकार्य केले नाही.

  • “हे प्रकरण खूप जुने असून प्रगतीशिवाय ते बोर्डवर ठेवण्यात काहीच अर्थ नाही,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा दावा फेटाळला.

“हा जनतेचा विजय”

या निकालावर प्रतिक्रिया देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन जनतेच्या हितासाठी न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळेच न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. हा फलटणच्या जनतेचा लोकशाही मार्गाने झालेला विजय आहे. आता विमानतळ उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे.”


Back to top button
Don`t copy text!